तिरुवनंतपुरम : केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या तिरुवनंतपुरम येथील निवासस्थानातून ईडी अधिकाऱ्यांना बाहेर पडताना हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. कन्नूर येथील विजयन यांच्या घरात छापेमारी केल्यानंतर ईडीचे अधिकारी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते परंतु सीपीआय (एम) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या तपास अधिकाऱ्यांना गेटवरच रोखून धरले.
कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा घेतला त्यामुळे याठिकाणी वातावरण चांगलेच तापले. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि स्थानिक पदाधिकारी सरसावले. या नेत्यांनी संतापलेल्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातच गोंधळ माजला आणि धक्काबुक्कीपर्यंत प्रकरण पोहचले. काही कार्यकर्त्यांनी दगडफेक करत ईडी अधिकाऱ्यांच्या वाहनांची काच फोडली. या गोंधळातच अधिकाऱ्यांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. केरळचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते पिनराई विजयन यांच्यावरील ईडी कारवाईमुळे राजकीय वाद उभा राहिला आहे. या प्रकरणावर सीपीआय (एम) महासचिवांनी केंद्र सरकार आणि ईडीवर जोरदार हल्लाबोल केला.
ही कारवाई राजकीय आकसातून केली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट करून त्यांच्यावर दबाव आणण्याची ही रणनीती आहे. देशातील विविध भागात, दिल्लीसह इतर ठिकाणीही मोठ्या राजकीय नेत्यांवर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याविरोधात बनावट आरोप करून अटकेची कारवाई केली जाते. अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांच्याबाबतीतही आम्ही पाहिले. ट्रायल कोर्टाने त्यांना दिलासा दिला. त्यामुळे हे भाजपा आणि आरएसएस यांच्या राजकीय रणनीतीचा भाग आहे असं सीपीआय एमचे महासचिव बेबी यांनी आरोप केला.
विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न
ईडीसारख्या स्वायत्त तपास यंत्रणांनी निष्पक्षपणे काम करायला हवे पण तसे होत नाही. ईडी भाजपा आणि आरएसएस सरकारचं हत्यार झाले आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी आणि राजकीय विरोधकांना घाबरवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला जातो असा आरोप सीपीआय नेत्यांनी केला आहे. ईडीच्या केरळमधील कारवाईनंतर राज्यात तणाव निर्माण झाला आहे.
नेमकं काय घडलं?
बुधवारी ईडीने केरळमधील १० ठिकाणांवर छापेमारी केली. त्यात माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते पिनराई विजयन आणि त्यांची मुलगी वीणा विजयन यांच्यावर कारवाई करण्यात आली. कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही धाड टाकल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यात पिनराई विजयन यांची मुलगी आणि त्यांच्या कंपनीचे नाव समोर आले. हे प्रकरण कोचीस्थित कोची मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेड (CMRL) यांच्याशी संबंधित कथित बेकायदेशीर देयके आणि आर्थिक अनियमिततांशी निगडित आहे. त्यांनी २०१८-१९ पासून तीन वर्षे कोचीस्थित कोचीन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेड (CMRL) कडून कोणतीही सेवा न देता "बेकायदेशीर रक्कम" स्वीकारली. २०१७ मध्ये एक्झालॉजिक आणि CMRL यांच्यात सॉफ्टवेअर आणि मार्केटिंग सेवांसाठी एक करार झाला होता परंतु कुठल्याही कामाशिवाय कोट्यवधीचे व्यवहार करण्यात आले असा आरोप आहे.